कऱ्हाड सरांची धडपड
दापोली प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत असणारे वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोलीचे प्राचार्य डॉ. भारत कर्हाड यांनी “दहावीनंतर काय?” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
दापोली तालुक्यातील कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर, तेरेवायंगणी आणि लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ येथे हे मार्गदर्शन सत्र पार पडले. यामध्ये करिअर संधी, योग्य अभ्यासक्रम निवड, कौशल्याधारित शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
शिक्षणासंबंधी जागृतीसाठी डॉ. कर्हाड यांचे विशेष योगदान
तेरेवायंगणी येथे कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. शिगवण यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. योग्य शाखेची निवड, व्यावसायिक अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ येथेही सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्ष श्री. अभय गोयथळे यांनी प्राचार्य डॉ. कर्हाड यांचे स्वागत केले. यावेळी सचिव ॲड. प्रशांत शहा, संचालक श्रीमती सुषमा रेडिज, मुख्याध्यापक सौ. बनकर प्रियंका महेंद्र, सौ. निमकर गायत्री, सौ. फणसकर कामिनी, श्रीमती गावडे रोशनी आणि श्री. लुंगसे बालाजी आदी मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन सत्रात प्रा. लक्ष्मीकांत पाटील आणि ग्रंथपाल तेजस रेवाळे यांनी वराडकर बेलोसे महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम, कौशल्यविकास उपक्रम आणि करिअर संधींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कला, विज्ञान, वाणिज्य, चार्टर्ड अकाउंटन्सी, व्यवसाय व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सल्ले
डॉ. कर्हाड यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा होईपर्यंत टीव्ही, मोबाईल, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी योग्य वेळापत्रक तयार करणे, आत्मविश्वास ठेवणे आणि नियमित अभ्यास करणे यावर भर दिला. पालकांनी शांत आणि अभ्यासास पोषक वातावरण निर्माण करावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या मार्गदर्शन सत्रास शिक्षकवृंद आणि दहावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग्य करिअर निवडीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
डॉ. भारत कर्हाड हे दापोली तालुक्यातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी हे सत्र घेतले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेली ही धडपड विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
