विलीनीकरण अध्यादेशानंतरच माघार
रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे एकही फेरी सुटू शकली नाही. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, असा अध्यादेश आला पाहिजे, याकरिता कर्मचारी अडून बसले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आज लांब पल्ला, शहरी वाहतुकीसह ग्रामीण फेऱ्याही थांबल्या. आज (ता. ९) रोजी प्रथमच विभागीय कार्यशाळा (वर्कशॉप) आणि टीआरपी (टायर रिमोल्डिंग प्लॅंट) येथील कारागिरांनीही बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामुळे आज बंद शंभर टक्के झाला.बंदचा आजचा दुसरा दिवस होता. बंदची कल्पना असल्याने प्रवाशांनी आज रहाटागर आणि मध्यवर्ती बस स्थानकाकडे पाठ फिरवली. त्यामुळे येथे शुकशुकाट होता. ज्या प्रवाशांनाही माहितीच नव्हती, असे काही प्रवासी बस स्थानकात पाहायला मिळाले, परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांनी मिळेल, त्या खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला दिला. कामावर जाणाऱ्या प्रवाशांची आज दाणादाण उडाली. नेहमी ग्रामीण, दुर्गम भागातून शहराच्या व तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या कामगारांना पर्यायी व्यवस्था करून कामावर यावे लागले. काहींना चक्क कामावर दांडी मारावी लागली.
अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आज विभागीय कार्यशाळा आणि टीआरपी येथील यांत्रिक कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामुळे दिवसभरात एकही गाडी दुरुस्त करण्यात आली नाही. रत्नागिरी आगाराच्या सर्व गाड्या माळनाका येथील एसटी आगारात लावून ठेवल्या होत्या. अनेक चालक, वाहक आज गणवेशात हजर होते.संप नव्हे बंदसंप करताना कामगार संघटनांना रा. प. महामंडळ प्रशासनाला नोटीस द्यावी लागते, परंतु आता सर्वच संघटनांसह कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आमचा संप नव्हे, तर बंद आहे. काही ठिकाणी संप असा उल्लेख केला जात असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही बंद पुकारल्याचे सांगितले.माळनाका कार्यालयाबाहेर आंदोलनएसटीच्या माळनाका येथील विभागीय कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालू ठेवले आहे. या ठिकाणी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, लिपीक आदींसह कार्यालयीन कर्मचारीही उपस्थित होते. एसटीचे प्रशासनही बंदमध्ये सहभागी झाल्याने एकंदरीतच कामकाज ठप्प झाल्याची स्थिती होती.