रत्नागिरी : सह्याद्रीच्या खोऱ्यातील माचाळच्या डोंगरातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीतील सात धबधबे आणि त्या खालील दहा रांजण खळगे म्हणजे साहसी पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. ते रांजण खळगे निसर्गाचा चमत्कार आहे. आजूबाजूला गर्द झाडी, कड्या-कपाऱ्यांतून काढावा लागणारा मार्ग, रांजण खळग्यातून पोहून पुढे जाण्याचे थ्रिल अंगावर रोमांच आणणारेच आहे. हा जिद्दी माऊटेनिअर्स्च्या सदस्यांचा अनुभव असून साहसी पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे आव्हान आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात भटकंती करण्यासाठी प्रचंड धाडस लागते. अंगी चिकाटी, कणखरपणा आणि निसर्गाचे प्रचंड वेड असलेला माणूसच ही न संपणारी भटकंती करू शकतो. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर; परंतु या महाबळेश्वरनंतर दुसऱ्या क्रमांकाने नव्याने उदयास आलेले उंचावरील थंड हवेचे ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ हे गाव. याच माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो. मुचकुंदीला थोडीशी धार्मिक जोडही आहे. याच नदीच्या प्रवाहात अनेक रांजण खळगे आणी धबधबे बनवत खाली खोरनिनको येथे सह्याद्रीतून येणार्या इतर नद्यांना मिळते. या प्रवाहातील सर्व धबधबे, रांजण खळगे रॅपलिंग करत खाली उतरण्याचा प्रवास जिद्दी माऊंटेनिअर्स्चे सदस्य राकेश हर्डीकर, भुजंग येळगुकर, उमेश गोठिवरेकर, अरविंद नवेले यांच्या पथकाने केले.
हा थरार अनुभवणाऱ्या गोठीवरेकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मुचकुंदीमधील ही अवघड वाट पार करण्यास दोन दिवस लागले. एक रात्र नदी पात्रातच काढली. दोन धबधब्यांमध्ये सुमारे ५०० ते ८०० मीटर अंतर आहे. त्यांची उंची सर्वसाधारणपणे ८० ते १५० फुटापर्यंत. रांजण खळग्यांची खोली अंदाजे २० ते ४० तर काहींची अंदाजे ५० ते ६० फूट खोल. गोल विहिरीसारख्या रांजण खळग्यातील पाणी निळेशार आहे. रॅपलिंग करत धबधबा पार करावयाचा असल्यास रांजण खळग्यात उतरूनच पुढे जावे लागते. त्यामुळे तो थरार अंगावर रोमांच आणणारा असाच आहे. आजूबाजूला गर्द झाडी, कडे-कपारी साहस करणार्यांसाठी आव्हानात्मकच आहे. खळग्यांची निश्चित उंची माहिती नसली तरीही ते पावसाळ्यातील पाण्याबरोबर आलेले दगड त्यात दिसतात. त्यामुळे माणसाने जाऊन खोली तपासणे तितकेच धोकादायकही होते. या सर्व ट्रेकचे ड्रोनने शूटिंग केले असून यू ट्यूबवर ते पर्यटकांना अनुभवता येते.
कसे झाले रांजण खळगे?धबधब्याचे पाणी प्रवाहाबरोबर वेगाने खाली पडल्यामुळे तळात खोलगट खड्डे पडतात. वर्षानुवर्षे ते सातत्याने पाणी पडून त्या खड्ड्यांची खोली वाढत गेली. त्यातून रांजणसारखे विहिरीप्रमाणे खळगे पडले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. काहींनी ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे खड्डे तयार केल्याचाही अंदाज वर्तवला आहे.