लांजा, तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोग व अन्य योजनांतील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ अनिल सहदेव नार्वेकर यांनी १ मे पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
हर्चे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोग व अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याबाबत अनिल नार्वेकर यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे दावा केला आहे.
या भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळावा, म्हणून यापूर्वी त्यांनी २६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांच्या या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, असे त्यांना सांगितले होते. मात्र, या गोष्टीला जवळपास तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी कोणतीच कारवाई झालेली नाही.
हर्चे ग्रामपंचायतीची चौकशी झालेली नसल्याने प्रशासन अशा या भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात कानाडोळा करत असल्याने अखेर त्यांनी १ मे पासून उपोषण सुरू केले आहे.