मालवण : दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर येथील पर्यटन बहरले आहे. पर्यटकांच्या स्वागताबरोबर दर्जेदार सुविधा देण्यावर पर्यटन व्यावसायिकांनी भर दिला आहे. दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यास आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक पर्यटकांकडून बुिकंग झाले. कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसाय बहरत असल्याने पर्यटन व्यावसायिकांना सुगीचे दिवस येतील, असे चित्र आहे.
कोरोनाच्या दीड-दोन वर्षांच्या काळात पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहिला. परिणामी पर्यटन व्यवसायातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल थंडावली. स्कूबा, स्नॉर्कलिंगधारक, होडी व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. कामगारांचे पगार, वीज बिले, बँकांची थकलेली कर्जे यामुळे पर्यटन व्यावसायिक बेजार झाला. दागिने गहाण ठेवून कामगारांचे पगार, वीज बिले, बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरेल व पुन्हा येथील पर्यटन बहरेल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिक बाळगून होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाने पर्यटन खुले केले; मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने देश, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. अनेक पर्यटकांनी आपली बुकींग रद्द केल्याने त्याचा मोठा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला.
सप्टेंबरपासून किरकोळ पर्यटक येथे दाखल होत होते; मात्र वॉटरस्पोर्टस्, स्कूबा, स्नॉर्कलिंग, किल्ला प्रवाशी होडी वाहतूक सुविधा सुरू नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता. गेल्या महिन्यात किल्ला प्रवाशी होडी वाहतुकीस तसेच वॉटरस्पोर्टना परवानगी मिळाल्यानंतर गोव्यासह अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांनी येथील किनारपट्टी बहरून गेली आहे. स्कूबा, स्नॉर्कलिंग, साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून घेतला जात आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे हॉटेल व्यवसाय तसेच पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले व्यवसाय पुन्हा उभारी घेण्यास सज्ज झाले आहेत.
पर्यटनाबाबत जिल्ह्याची स्थितीबुकिंग कंपन्यांशी जोडलेल्या व्यावसायिकांची संख्या २५ टक्केमॅन्युअल आणि ऑनलाईन बुकिंगची सुविधाआतापर्यंत ७० टक्के पर्यटकांकडून बुकिंगवाढत्या महागाईमुळे जेवणाच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढखड्डे, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्यापर्यटनदृष्ट्या समस्या सोडविण्याची होतेय मागणी”कोरोनाची लाट ओसरल्याने पर्यटन खुले झाले. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. दीड- दोन वर्षांत व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, आता पर्यटन पुन्हा बहरत असल्याने याचा निश्चितच फायदा होईल. दिवाळी सुटीनिमित्त येणाऱ्यांचे २० नोव्हेंबरपर्यंत चांगले बुकिंग झाले आहे.”- मिथिलेश मिठबांवकर, पर्यटन व्यावसायिक, मालवण