ऱाजापूर :- पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे. वारीशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. रिफायनरी हटवा. कोकण वाचवा अशा घोषणांनी राजापूर दणाणून गेले. पत्रकार वारिशेंच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या रिफायनरी विरोधी जनतेने तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला.
राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चामध्ये कोकण रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम, रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. खासदार विनायक राऊत, विलास चाळके, कमलाकर कदम, प्रकाश कुवळेकर, रामचंद्र सरवणकर यांच्यासह उध्दव ठाकरे सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या मोर्च्यामध्ये नाणार व बारसू परीसरासह आजुबाजुच्या भागातून मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. या मोर्चात रिफायनरी विरोधी घोषणा देण्यात आल्या. कोकणची भूमी वाचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे. यासह दिवंगत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप व्हायलाच हवी अशा घोषणा देण्यात आल्या.