राजापूर :- तालुक्यातील कोदवली येथे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या झालेल्या अपघात प्रकरणी थार गाडी चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर राजापूर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली . आंबेरकर याला राजापूर न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई – गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोलपंपासमोर सोमवारी दुपारी भरधाव वेगातील थार गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी पत्रकार शशिकांत शंकर वारीशे ( वय ४५ रा . कशेळी ) यांचे आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले . याबाबतची फिर्याद अपघातातील मयत शशिकांत वारीशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले , राहणार तेली आळी रत्नागिरी यानी राजापूर पोलिसांत दाखल केली.
सोमवारी दुपारी पत्रकार शशिकांत वारीशे दुचाकी ( क्रमांक एम . एच . ०८ एएस ०८७६ ) घेऊन राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपावर गेले होते . दुचाकीत पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून पंपाबाहेर येत असतानाच समोरून भरधाव वेगात आलेल्या थार गाडीने ( क्रमांक एमएच ०८ एएक्स ६१०० ) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली . या धडकेत वारीशे हे दुचाकीवरून खाली पडले तर त्यांची दुचाकी धार गाडीबरोबर फरफटत सुमारे २०० ते २५० फूट पुढे गेली .. या अपघात प्रकरणी थार गाडी चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर राजापूर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला .आज मंगळवारी पंढरीनाथ आंबेरकर याला राजापूर पोलिसांनी अटक करत राजापूर न्यायालयात हजर केले असता राजापूर न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली.
शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी संदर्भातील एका व्हॉट्सॲप गृपमध्ये एका बातमीची पोस्ट केली होती. “मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो” अशा आशयाच्या बातमीचे कात्रण वारीशे यांनी सोमवारी सकाळी गृपवर पोस्ट केले होते. त्यानंतर सोमवारी दुपारी हा अपघात झाला . हे अपघात प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पंढरीनाथ आंबेरकर रिफायनरी समर्थक असून त्याच्याकडे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्षपद होते.