रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर माझे वैयक्तिक लक्ष आहे. मी कोकणला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार. साहेबांना सांगा, हा विषय मी लवकरच संपवतोय, असा निरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाद्वारे राज ठाकरे यांना दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ११ वर्षे रखडले आहे. महामार्गाच्या या गोंधळाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी याबाबत रान उठवले होते. त्यांनी नुकतेच केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवास्थानी भेट घेतली, त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सहा टप्प्यात सुरू आहे. त्यापैकी रायगडपासून पुढे चिपळूणपर्यंत तर सिंधुदुर्गपासून राजापूरपर्यंत ८० ते ९० टक्केच्या वर काम झाले आहे. संगमेश्वर ते लांजा-राजापूर दरम्यान सुमारे ९२ कि.मी.च्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. या टप्प्यांचे काम असलेल्या कंपन्यांना केंद्र शासनाने अनेक नोटिसा दिल्या. त्यांच्या ठेका काढण्यापर्यंत कारवाई गेली तरी कामात काही सुधारणा झालेली नाही. तीन ते चार वर्षांमध्ये पूर्ण होणारे हे काम ११ वर्षे झाली रखडले आहे. याबाबत अनेकांनी आवाज उठवला, आंदोलन केले तरी त्याला फारशी गती मिळाली नाही. आता रखडलेल्या या दोन्ही टप्प्यातील ठेकेदार बदलण्यात येणार आहेत. ज्या कंपनीने काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, अशा कंपनीला या दोन्ही टप्प्यांचा ठेका देाणार आहे.
मनसेकडून सातत्याने चर्चाआता मुंबई-गोवा महामार्गाच्या गोंधळाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी काही महिन्यांपासून याबाबत रान उठवले आहे. महामार्गाचे मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याशी सातत्याने चर्चा, आंदोलने करून मनसेने या विषयावर प्रशासनालाही हलवले. याच विषयावर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण आणि चिले यांनी मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली.पाप मी निस्तरतोय…काँग्रेस-राष्ट्रवादीचेच पाप मी निस्तरतोय, पण या महामार्गाच्या कामावर माझे वैयक्तिक लक्ष आहे. मी कोकणला लवकरात लवकर चांगला रस्ता देऊ, हा माझा शब्द आहे आणि मी शब्द पाळतो. म्हणूनच कामाची गती वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडलाय, त्या दोन ठेकेदारांना मी बदलतोय काळजी करू नका, असे गडकरी यानी विषय समजून घेऊन आश्वस्त केले.
