November 17, 2024 Sunday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Virat Morcha of OBC Samajbandhavs at District Collector's Office in Konkan

कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा

कोकणात उसळला ओबीसींचा जनसैलाब... महिलांचा प्रचंड सहभाग...! जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आता विधानसभा, लोकसभेत झेंडा फडकविण्याची गर्जना

रत्नागिरी : देशाला संविधान देणारे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसींना आरक्षणाची तिजोरी दिली. मात्र, गेल्या ७० वर्षात या बारा बलुतेदार असलेल्या बहुसंख्य घटकाला राजकीय आरक्षणासह वंचित ठेवले. परंतु जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही, राजकीय आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा समाज शांत राहणार नाही. आता विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसीचा झेंडा फडकणारच, अशी गर्जना करत हजारो ओबीसी बांधवांचा धडक मोर्चा शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी धडकला.

“जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ओबीसी मोर्चात बलाढ्य कुणबी समाजाची लक्षणीय उपस्थिती”.

“उठ ओबीसी जागा हो, या देशाचा धागा हो”, “ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे”, जय शिवाजी, जय भवानी, संविधानाचा विजय असो,  अशा गगनभेदी घोषणांनी मारुतीमंदिर परिसर दणाणून गेला होता. 2021-2022 ची सार्वत्रिक जनगणना करावी या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढला. या जनआक्रोश मोर्चाची सुरुवात मारुती मंदिर येथून झाली. त्यानंतर लोकनेते शामराव पेजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हजारोंच्या संख्येने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जनआक्रोश मोर्चाद्वारे सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

हा मोर्चा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, ओबीसी अल्पसंख्याक समाजनेते शब्बीर अन्सारी, समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, जनमोर्चाचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, नंदकुमार मोहिते, कुमार शेट्ये यांनी केले. यावेळी समन्वय समितीचे दीपक राऊत, महेश उर्फ बाबू म्हाप, राजू कीर, हारिस शेकासन, महेश नाटेकर, संतोष गोवळे, संतोष थेराडे, अविनाश लाड, प्रकाश रसाळ, प्रकाश साळवी, सौ. साक्षी रावणंग, सुजाता पाष्टे, स्नेहा चव्हाण, यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच ओबीसींचे अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती.

जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही, ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या सरकारला स्वस्थ बसू न देण्याचा व निवडणुका होऊ न देण्याचा गंभीर इशारा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी दिला आहे. “ज्यांची तुम्ही बटणं दाबताय त्यांनीच तुमच आमचं मरण स्वस्त केलंय, सर्व सत्ता आेबीसींच्या ताब्यात जाईल म्हणुन आरक्षण घालविण्याचे काम सध्या सुरु आहे” असे आेबीसी नेते अविनाशदादा लाड यांनी बोलून  ओबीसी समाजबांधवांच्या  भावना व्यक्त केल्या.

या मोर्चाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष पदीप उर्फ बंड्या साळवी यांनीही भेट देऊन पाठिंबा दर्शवला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना ओबीसी समन्वय समितीच्यावतीने ओबीसी जातनिहाय जनगणना व राजकीय आरक्षण आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाला संबोधित करताना जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशअण्णा शेडगे यांनी सांगितले की, गेली 70 वर्षे ओबीसीत फुट पाडण्याचे, हक्काची भाकरी हिसकावून घेण्याचा कार्यक्रम राज्यात सुरू आहे. ओबीसींच्या 4 पिढ्या मातीत घालण्याचे काम व्यवस्थेने केले आहे. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. पण केंद्र व राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. जोपर्यंत ही जनगणना होत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नसल्याचा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला. 

जातनिहाय जनगणना करणार नसाल तर तुम्हाला सत्तेवर बसू देणार नसल्याचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी ठणकावले. यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना ओबीसी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेऊन केंद्र सरकारला देण्यासाठी निवेदन सादर करत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी ओबीसी बांधवांच्या या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली.

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top