मुंबई प्रतिनिधी :
चर्मकार (चांभार) समाजाविरोधात “चोर चांभार” असे अपमानास्पद आणि जातीय द्वेषाने भरलेले वक्तव्य करणाऱ्या नदीम खान व ते प्रसारित करणाऱ्या “ViralBollywood” यूट्यूब चॅनलविरोधात राज्यभर तीव्र रोष उसळला आहे. या घटनेमुळे चर्मकार समाजाच्या आत्मसन्मानावर गदा आली असून, समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
“गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघा”चा तीव्र निषेध आणि ठोस भूमिका:
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दीपक सिताराम खोपकर यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून म्हटले, “नदीम खान याने केलेले वक्तव्य केवळ अपमानकारक नसून, संविधानाच्या मूल्यांविरुद्ध आहे. ‘ViralBollywood’ या चॅनलने ते प्रसारित करून समाजात विष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारांमुळे सामाजिक शांततेला तडा जाऊ शकतो.”
संघटनेने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989 (अट्रॉसिटी कायदा) अंतर्गत दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर अशा चॅनल्सना बंदी घालून समाजविघातक प्रवृत्तीवर कडक निर्बंध आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“ViralBollywood” चॅनलच्या भडक वृत्तीचा निषेध:
हा प्रकार केवळ एका समाजावरील प्रहार नसून, समाजात द्वेष व फूट पाडण्यासाठी केलेली जाणीवपूर्वक चिथावणी असल्याचे स्पष्ट आहे. या घटनेत यूट्यूब चॅनलने गैरजबाबदार वृत्ती दाखवत समाजात तेढ निर्माण होईल असे विधान प्रसारित केले. यामुळे या चॅनलवर तातडीने बंदी आणून जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
संघटनेच्या ठोस मागण्या:
1. नदीम खान याला अटक: नदीम खानवर अट्रॉसिटी कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
2. चॅनलला बंदी: “ViralBollywood” चॅनलचे प्रसारण तत्काळ थांबवून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.
3. न्यायालयीन चौकशी: चर्मकार समाजाच्या सन्मानासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी.
4. माध्यमांवर नियंत्रण: समाजविघातक व चिथावणीखोर सामग्रीवर त्वरित नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदे लागू करावेत.
चर्मकार समाज हा देशातील ऐतिहासिक वारसा आणि कलेचा एक अभिमानाचा घटक आहे. परंतु अशा प्रकारच्या जातीय द्वेषपूर्ण विधानांमुळे केवळ चर्मकार समाज नव्हे, तर संविधानावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
या प्रकारानंतर राज्यभरात सामाजिक आणि राजकीय पातळीवरून मोठा विरोध दिसून येत आहे. विविध सामाजिक संघटना, संघटनांचे नेते, आणि नागरिकांनी राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध करत निषेध मोर्चांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. या घटनेवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर समाजात शांतता बिघडण्याची शक्यता आहे. संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री, अनुसूचित जाती आयोग, आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली असून, कडक कारवाईची मागणी केली आहे.
या संपूर्ण घटनेवर बोलताना संघटनेने स्पष्ट केले की, “जर दोषींवर तातडीने कारवाई केली नाही, तर समाजात रोष उफाळून येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेऊन दोषींना शिक्षा दिली पाहिजे.”
“गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ”ने समाजाच्या सन्मानासाठी लढण्याचा निश्चय केला आहे. या घटनेवर संघटनेची ठाम भूमिका असून, दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
या संदर्भात संघटनेचे महिला प्रदेश अध्यक्षा मनिषा ताई ठवाळ, उपाध्यक्ष सुनील नेटके आणि अनिल कदम, सचिव नरेंद्र वाडेकर, सहसचिव चंद्रकांत नरसोडे, तसेच प्रसिद्धी प्रमुख सचिन खरात यांनीही तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली असून, दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त केला आहे.
“जातीय विषारी मानसिकतेचा अंत झाला पाहिजे,” असे आवाहन संघटनेने करत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.