अलिबाग : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांची रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत शुक्रवारी सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. मालप यांना २ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश होते. मात्र, त्यांना नोटीस वेळेवर न मिळाल्याने ते शुक्रवारी हजर राहिले.
साळवी यांची रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असून, आता त्यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मालप हे अलिबाग कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर झाले. विभागामार्फत मालप यांची दीड तास चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत साळवी हे सुद्धा होते.