January 22, 2025 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

रुग्णालयातील मनुष्यबळ पुरवठा कामात KHFM कंपनीचा कामगारांच्या वेतनात ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार

मुंबई प्रतिनिधी :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेता प्रशासकीय अधिकारी बसवून मुंबई महानगर पालिकेचे कारभार सुरू असतानाच कंत्राटी कामगारांच्या वेतनात अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप RTI कार्यकर्ते आणि दलित युथ पँथर चे मुंबई सचिव – पँथर आदित्य मैराळे यांनी केला आहे. मुंबई मनपा मध्यवर्ती खरेदी खाते तर्फे १३ डिसेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधी करिता KHFM या कंपनीला मुंबई उपनगरातील ईस्ट आणि वेस्ट झोन मधील १०(दहा) रुग्णालयात हाऊस कीपींग कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवठा कामाचे कंत्राट दिले आहे. पँथर आदित्य मैराळे यांनी या कंत्राटी कामगारांशी चर्चा केली असता अशी माहिती मिळाली की , कामगारांना किमान वेतन कायदा नुसार जे वेतन मिळायला पाहिजे त्यात आणि दरमहा कामगारांना बँक खात्यात प्रत्यक्ष जमा होणाऱ्या वेतनात १०,०००/- रुपये इतका फरक आहे.

सार्वजनिक निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा म्हणून उद्योग , ऊर्जा आणि कामगार विभागाने परिपत्रक काढले असून, त्याचे पालन करणं मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने कंत्राटदाराने कामगारांना वेतन दिल्याच्या कंत्राटदाराच्या बँक विवरणाच्या प्रती , कर्मचारी हजेरी नोंदवही च्या प्रती,pf,esic ,केलेल्या शासकीय भरणांच्या पावत्या तपासणी केल्या शिवाय बिले प्रमाणित करून पारित केली जाऊ नयेत असे परिपत्रकात आदेश आहेत. कंत्राटी कामगार कायदा १९७० नुसार ही फरकाची रक्कम मुख्य नियोक्ता या नात्याने मुंबई महानगरपालिकेने कामगारांना चुकती करावी व मागाहून कंत्राटदाराकडून वसूल करावी अशी मागणी राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.भारती राजुलवाला यांच्या कडे २१ मे २०२४ रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला पळवाटा शोधणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या डॉ.भारती राजुलवालांनी KHFM कंपनी तर्फे कामगारांना किमान वेतन दिले जाते असे खोटे उत्तर पत्रातून दिले असून पत्रात कोठेही वेतनाच्या रक्कमेचा उल्लेख केलेला नाही शिवाय कामगारांनी तक्रार केली तरच दंडात्मक कारवाई करू असेही म्हटले आहे. सार्वजनिक निधीचा विनियोग योग्य प्रकारे होतो की नाही हे पाहण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्यांनीच कामगारांचे वेतन लाटण्याच्या उद्देशाने शासनाचे , कामगार विभागाचे आदेश झुगारून नियम कायद्यांचे उल्लंघन करून कंत्राटदाराने देयके सादर करताना आवश्यक कागदपत्र जोडले नसताना मनमानी पद्धतीने बिले प्रमाणित करून पारित केली असून कोणीही कोणाला फुकटात पाठीशी घालत नाही अनेक अधिकारी यात सामील असल्याने कारवाईत दिरंगाई होत आहे असा आरोप पँथर आदित्य मैराळे यांनी केला आहे.

मुंबई उपनगरातील १० रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात एकूण ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून लेखा अधिकाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी , डॉ.भारती राजुलवालांना बडतर्फ करावे तसेच KHFM या कंत्राटदार कंपनी काळया यादीत टाकावे आणि कामगारांना पगारातील फरकाची रक्कम मुंबई महानगर पालिकेने चुकती करावी व मागाहून कंत्राटदार कडून वसूल करावी अशी मागणी दलित युथ पँथर चे मुंबई सचिव श्री. आदित्य मैराळे यांनी मनपा आयुक्त भूषण गगरानी , कामगार आयुक्त बांद्रा , उपनगरीय वैद्यकीय अधीक्षक यांच्या कडे पत्राद्वारे केली असून मागण्या पूर्ण न झाल्यास प्रमुख वैद्यकीय अधीक्षक उपनगरीय रुग्णालय , भाभा रुग्णालय , बांद्रा यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top