रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीनंतर बंद ठेवण्यात आलेले रत्नागिरी शहरातील प्रसिध्द पर्यटनस्थळ थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक स्मारकासह राज्य संरक्षित स्मारके आणि म्युझिअम पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत फिरायला येणार्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च 2020 ला सुरु झाला आणि सर्वच व्यवहार ठप्प झाले. गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. दुसरी लाट ओसरली तरीही मंदिरे आणि स्मारके पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे रत्नागिरी शहरासारख्या ठिकाणी फिरायला येणार्या पर्यटकांपुढे समुद्र किनारा, किल्ला या व्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नव्हता. महिन्याभरापुर्वीच मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. रत्नागिरी शहरात आल्यानंतर फिरायला जाणार कुठे हा प्रश्नच होता. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी ही बाब प्रशासनापुढे मांडलेली होती. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने 11 नोव्हेंबरपासून मत्स्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ शासनाने आदेश देत थिबा राजवाडा, लोकमान्य टिळककांचे जन्मस्थान यासह अन्य स्मारके आणि म्युझिअम पर्यटकांना बघण्यासाठी खुली केली आहेत. हे आदेश शुक्रवारी (ता. 12) पुरावतत्व विभागाला प्राप्त झाले होते. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून झाली आहे.
थिबा राजवाड्याला जागतिकस्तरावर महत्त्व आहे. त्यामुळे अनेक अभ्यासक याठिकाणी भेट द्यायला येत असतात. दरवर्षी हजारो पर्यंटक या ठिकाणी हजेरी लावतात. टिळक आळीतील लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थानावरही पर्यटक येत असतात. कोरोनामुळे ही ठिकोण बंद ठेवल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होती होती. ती आता दूर झाली आहे. दिवाळी सुट्टी संपत आली असली तरीही कोरोनामुळे अनेकांना फिरण्याची संधी मिळालेली नव्हती. ते पर्यटक रत्नागिरीकडे येऊ लागले आहेत. मत्स्यालय, टिळक स्मारक, थिबा राजवाडा सुरु केल्यामुळे पर्यटकांचा मुक्काम वाढणार आहे.
पुरातत्व संचालनालयाच्या अंतर्गत असलेली राज्य संरक्षित स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळे प्रेक्षक व पर्यटकांसाठी 12 नोव्हेंबरपासून खुली करण्यात येत आहेत.- विलास वाहणे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग